रक्षाबंधन

 #रक्षाबंधन 


सौ.हेमा पाटील 


समोरच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलिसदादाने जोरात दोनदा शिट्टी फुंकली अन् हाताने इशारा करत तिला गाडी बाजूला घ्यायला सांगितले. 

  रस्त्यावर गाडी चालवत असताना मागून ,पुढून ,शेजारुन कुठल्याही गाडीने कितीही हाॅर्न दिला तरी कधीही गाडी जागेवरुन तसूभरही बाजूला न घेणार्या तिला आता मात्र पाय टेकवत स्कूटी साईडला घ्यावी लागली.


शिपाईदादा जवळ आले..

"काय मॅडम.. रस्त्यावर नियम पाळून गाडी चालवायची असते"...


"हो दादा..हे काय मी हेल्मेट घातलेय की"..


"अहो मॅडम"...


पण त्यांना पुढे बोलू न देता ती म्हणाली,"अन् गाडीवर तर मी एकटीच आहे..टिबल सीट कुठे चालले होते"..


यावेळी तिच्याकडे आपादमस्तक पहात पोलिस दादा उद्गारले...

"बघा.. म्हणजे आपल्याला रस्त्यावरचे नियम पण आम्हीच शिकवायचे का" ?


"नाही नाही दादा..! मी अगदी परीक्षा देऊन लायसन्स काढलेय..थांबा दाखवते".


"ते नंतर दाखवा‌..आधी मला सांगा,एवढी कसली घाई झाली आहे तुम्हाला"?


"काय सांगू तुम्हाला दादा , आम्हां बायकांचा कुणी विचारच करत नाही. अहो बघा ना,आज रक्षाबंधन असून सुद्धा आॅफीसला सुट्टी नाही हो..!😢😢 इथेच पाच मिनिटांच्या अंतरावर माझे माहेर आहे.तिकडे चालले होते लंच ब्रेक मध्ये..भावाला राखी बांधायला".


"ओ मॅडम..ते सगळे ठेवा तुमच्याजवळच...मला आधी हे सांगा तुम्ही राॅंग साईडने का आलात" ?


"अहो दादा , आत्ताच सांगितले ना..इथेच माझे माहेर आहे...रक्षाबंधन"...


"पुन्हा तेच..मला माहित आहे आज रक्षाबंधन आहे ते..पण तुम्ही राॅंग साईडने का आलात" ?


"दादा ,मला जर राईट साईडने आले तर बराsच लांबचा वळसा घालून जावे लागले असते.वेळ वाचवण्यासाठी आले हो..आजच आले एकदाच ! आजचा दिवस जाऊद्या हो मला".


"अहो मॅडम , नियम मोडला तुम्ही..अन् जाऊद्या काय म्हणताय वर"..


"अहो दादा, पेट्रोल कसे लीटर झाले आहे"?


"त्याचा काय संबंध इथे" ?


"पेट्रोल ची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे तर दर वाढलेत ना.. म्हणून मी पेट्रोलची बचत करण्यासाठी लाॅंग रुट टाळला.यात उलट मी देशाची सेवाच केली"...


"ओ देशभक्त मॅडम ..चला पावती फाडा.तुमचे ऐकून घ्यायला मला वेळ नाही.आधीच डोके खाल्लेय तुम्ही..जर एखाद्या गाडीची धडक बसली असती तर तुमचीच चुकी असूनही आमच्याच नावाने ओरड केली असती".


"दादा हात पुढे करा"..


पोलिस दादाने चलनाचे पैसे घेण्यासाठी हात पुढे केला..


"हा नाही..तो" ! 


"तिने पर्समध्ये हात घातला.एक राखी काढली व पोलीस दादाच्या हातावर पटकन बांधली".


"दादा, तुमच्या हातावर एकही राखी नव्हती.आजच्या दिवशी हात सुना सुना बरा दिसत नाही"...


दादाने हात जोडून नमस्कार केला.अन हजार रुपयांचे चलन फाडून पावती तिच्यासमोर धरली.


"काय हो दादा..आजचा दिवस या बहिणीला माफ करणार नाही का" ?


"ताई , संध्याकाळी घरी जेवायला या.पावतीवर मागे माझा पत्ता लिहिला आहे.पण चलन मात्र भरावेच लागेल.कारण माझ्याच बहिणीने नियम मोडलेला मला आवडणार नाही...अन् इथून पुढे देशाची काळजी करण्यापेक्षा स्वतः नियम पाळण्याची दक्षता घ्या..तीच खरी देशसेवा" !


 ताईच्याच पद्धतीने दादाने पद्धतशीरपणे ताईचे दात ताईच्या घशात घातले होते..इति हेमा उवाच 

सौ. हेमा पाटील.😊😊

Comments

Popular posts from this blog

रिती ओंजळ

नियती भाग १

जेटलॅग