वर्षाव शुभेच्छांचा

 

शुभेच्छांचा वर्षाव

   या शुभेच्छा देणारांचे पण मला विशेषच वाटते. कशाच्याही काय शुभेच्छा द्यायच्या राव ?
बेंदूर या सणाच्या शुभेच्छा? आपण काय बैल आहोत का? तसे बघितले तर बैलासारखे आपणही स्वतःला घाण्याला जोडून घेतलेच आहे म्हणा ! पण आपल्यासाठी वेगळे सण असतात ना! Father's Day ! Engineer's Day ! Doctor's Day ! 
मग बेंदराच्या शुभेच्छा कशासाठी? तो दिवस ज्यांच्यासाठी आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा.आजकाल खेडेगावात पण अख्ख्या गावात मोजून पंचवीस तीस बैल असतील.सगळी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जातात. मग शहरात बसून बेंदराच्या शुभेच्छा का द्यायच्या? त्याऐवजी  शहरात राहणाऱ्या नवीन पीढीला बैल करत असलेल्या शारीरिक कष्टांबाबत माहीती करुन द्या.शेतीतील त्यांचे योगदान समजून सांगा. अन्न वाया का घालवू नये ते शिकवा.
खरं तर बेंदूर या सणाला मुळावर आलेला सण म्हणतात. खेड्यात आजही बाकी कुठल्या सणाला पुरणपोळी केली नाही तरी एकवेळ चालते पण या सणाला पुरणपोळीचा नैवेद्य देवाला हवाच!
आषाढी एकादशी.. शुभेच्छा!
गुरुपौर्णिमा... शुभेच्छा!
आषाढी अमावस्या उर्फ गटारी अमावस्या... शुभेच्छा!
दीपपूजन.. शुभेच्छा!
श्रावण महिन्याची सुरुवात.. शुभेच्छा!
पहिला श्रावणी सोमवार... शुभेच्छा!
    काय आहे हे! अशा शुभेच्छा देऊन आपण काय साध्य करतो? गुरुपौर्णिमा हा आपल्या श्रीसद्गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो.त्याच्या कसल्या शुभेच्छा! हा दिवस अंतर्मुख होऊन आपली साधना तपासून पहाण्याचा असतो.
आषाढी अमावास्येबाबत तर मी काही लिहितच नाही इतके या दिवसाला बदनाम करण्यात आले आहे.
दीपपूजन हे दिव्यांची स्वच्छता व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असते.
आज वाॅटसअप आणि फेसबुकवर सगळीकडे नागपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा! हेच दिसतेय. खरं सांगू , हे वाचल्यावर मला आपण नागिण झालो आहोत की काय असेच वाटायला लागले. फुस्स फुस्स करणारी नगिना सिनेमातील श्रीदेवी आठवली.अर्थात अशा नागिणींसाठी पण  सण आहेतच की! तेच आपले Mother's Day! Valentine's day!

पण नागपंचमी हा सण नवविवाहित मुलींसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो.कारण श्रावण पाट्या देऊन तिची माहेरी पाठवणी केली जाते. या सणाला मुली झाडांना झोके बांधून त्यावर झुलतात.पण आजची नवविवाहिता नऊ पन्नास ची लोकल पकडण्यासाठी धावत पळत निघालीअसेल.तिच्या नशिबी कुठले आजच्या दिवशी झोपाळ्यावर बसून झुलणे!
आपण सण साजरे करतो यामागे विज्ञान आहे.कृतज्ञता आहे. पण नागपंचमीच्या मानवांना शुभेच्छा कशासाठी? हा प्रश्न मला पडतो बुवा ! डुलत डुलत मोबाईल वरुन नागपंचमीच्या शुभेच्छा फाॅरवर्ड करणाऱ्या समस्त ....ना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 😄 इति हेमा उवाच
दिनांक ८/८/२०२४

Comments

Popular posts from this blog

समज

रिती ओंजळ