कमजोरी

 कमजोरी

©® सौ.हेमा पाटील.


"काय गं शरु, तुला कितीदा सांगितलेय की माझी वाट बघत जाऊ नकोस. तू मुलांबरोबर जेवून घेत जा".


"अरे, मी पण तुला प्रत्येक वेळी सांगत आलेय, माझ्या घशाखाली एकटीने नाही घास उतरत" !


"आपल्यासाठी आपण जेवायचे असते.आपण जेवल्यावर आपले पोट भरते.दुसरे कुणी सोबत असले तरच जेवण जाते ही चुकीची समजूत आहे तुझी"!


"दुसरे कुणी नाही हं अनि ! तू ! तू सोबत असलास तरच"...


"हे अति होतेय शरु. दिवसा डबा घेऊन दोघे दोन दिशेला ऑफीसला जातो.तेव्हा तर जेवतेसच ना"? 


"तेव्हा नाईलाज असतो अनि"!


"मग तसेच समजून रात्री पण जेवून घेत जा.

मी तुला समजावून थकलो.माझ्या क्लायंट मिटींग असतात.खूपदा मला घरी यायला उशीर होतो.आणि क्लायंट सोबत काहीतरी खाणेही होते.घरी आल्यावर दिवसभराच्या दगदगीने इतका दमलेला असतो की कधी एकदा पाठ टेकेन असे होते.जेवायची सुद्धा इच्छा नसते.पण तू वाट पहात उपाशीपोटी ताटकळत बसलेली असतेस ना. मग तुझ्यासाठी चार घास का होईना खावे लागतात.

खरं तर तू पण इतकी दमलेली असतेस.मुलांबरोबर जेवून मागचे सगळे आवरुन झोपलीस तर तुलाही विश्रांती मिळेल.मला जेवायचे असल्यास मी हाताने वाढून घेऊ शकतो हे तुला माहीत आहे.तुझे असे वाट पहात ताटकळणे पाहिले की मला फार गिल्टी वाटते गं ! कसं समजावून सांगू तुला".


"यासाठीच मी तुझी वाट पहात थांबते रे.तुला दमल्यामुळे जेवायची अजिबात इच्छा नसते.मी थांबलेय म्हणून माझ्यासाठी का होईना तू चार घास खातोस तरी ! मी जर जेवून झोपले तर तू चार घास ही न खाता तसाच झोपशील हे मला माहीत आहे".


"तुला काय वाटतं शरु, हे मला समजत नाही? पण आता मी कुक्कुलं बाळ आहे का गं? माझी काळजी मी घेऊ शकतो .तुला त्रास झालेला मला सहन होत नाही".


"जसे मला त्रास झालेला तुला सहन होत नाही ना अनि, तसाच तू यायच्या आधी जेवून झोपण्याचा विचारही मी करु शकत नाही.याला हवे तर माझी कमजोरी समज.जसे मी आपण बाहेर जाताना  छान तयार झाले की शब्दांनी न सांगताच तुझ्या  नजरेतूनच मी छान दिसतेय याची पावती मिळते तसेच मी तुझ्यासाठी जेवायला थांबणे म्हणजे तुझी काळजी घेणे असते".


"आजच्या या धकाधकीच्या काळात नाही गं असे वागायचे! तुला ही ऑफीसमध्ये कामाचे खूप टेन्शन असते.आजकाल प्रत्येक जण आपापल्या स्पेससाठी आग्रही असतात.तू तर जगावेगळीच आहेस.कंपनीत एवढ्या वरच्या पोस्ट वर आहेस.अन् घरात नवऱ्याची जेवणासाठी काय वाट पहात बसतेस ! प्रेम जरुर करावे पण त्यालाही काहीतरी लिमिटस् असावीत".


"प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते अनि! तुझ्यावरील माझे प्रेम ही माझी कमजोरी आहे.एक क्षणभरही तुझा विचार दूर सारुन मी जगू शकत नाही.हे स्पेस वैगेरे इतरांसाठी नक्कीच वापरते मी! पण तू आणि मी वेगळे नाही..मी तुझ्यापासून दूर करुच शकत नाही स्वतःला! क्षणभरही...मी अशीच आहे आणि अशीच रहाणार" !

"वेडं कोकरु ते माझं" !

©® सौ.हेमा पाटील.


स्व लिखित

Comments

Popular posts from this blog

वर्षाव शुभेच्छांचा

समज

रिती ओंजळ