स्विकार
स्विकार
©️सौ. हेमा पाटील.
आयुष्यात ना, स्विकारता आले पाहिजे. एकदा स्विकारणे जमले, की आयुष्य खूप सोपे होऊन जाते.नाही पटत?...बरं ! स्विकारणे जमले की गोष्टी कशा सोप्या होतात हे सांगण्याचा प्रयत्न करते..बघा पटतेय का !
आमच्या बालपणी आजच्यासारखे मुलगा मुलगी एकसमान असे वातावरण नव्हते. आजही पूर्णपणे बदल झाला आहे अशातली गोष्ट नाही म्हणा..पण तेव्हा मुलाला प्रत्येक वेळी झुकते माप असायचे. हे डावललेपण स्विकारल्यामुळे पुढील आयुष्य खूप सोपे झाले. त्यामुळे घरातील, कुटुंबातील आपल्या मानाच्या स्थानासाठी कधीच प्रयत्न करावासा वाटला नाही.जिथे आहोत तिथे कायमच समाधान मानले. त्यामुळे कधी कुणाशी भांडण, वाद करण्याची वेळ आली नाही.अर्थातच ते जमले ही नसते ही गोष्ट वेगळी!
समोरची व्यक्ती कशी आहे , तिचे गुणदोष काय आहेत हे एकदा समजून घेतले आणि त्या गुणदोषांसकट त्या व्यक्तीला स्विकारले की एखाद्या प्रसंगी इतरांना जरी चुकीचे वाटले तरी ती व्यक्ती चुकतेय असे आपल्याला वाटतच नाही. कारण तिचे स्वभावदोष आपण जाणलेले असतात.ती अशीच वागणार हे आपण स्विकारलेले असते.
मग यात कुणी स्वार्थी असते, कुणी अहंकारी असते,कुणी रागीट असते तर कुणी कमालीचे संवेदनशील ही असते. शंकेखोर माणूस लग्नसमारंभात जेवणाचा आस्वाद घेण्याऐवजी जेवण शुद्धतेच्या कसोटीवर तपासून बघण्यातच त्याची सगळी चव बिघडून घेतो.लॉ ऑफ ॲट्रॅक्शन मुळे तुम्ही जे चिंतता तेच तुमच्या पदरात पडते...
आपण समोरच्याला आणि आयुष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीला सहजपणे स्विकारले की, आपल्या मनातील द्वंद्व समाप्त होते व आपली सगळी मानसिक शक्ती आपण त्या विपरित परिस्थितीला तोंड देण्यासाठी लावू शकतो. स्वतःला कुठल्याही परिस्थितीत शांत व स्थिर ठेवता येणे जमले तर भगवंत सांगतात ती अलिप्तता अगदी सहजतेने अंगिकारता येते.मग कितीही मोठ्यातील मोठ्या गोष्टीने, संकटाने मन विचलित होत नाही.कारण आलेल्या संकटाला ही सहजच स्विकारण्याची मनोवृत्ती झालेली असते.मोठे संकट तर कधीतरीच आयुष्यात डोकावते, पण नित्याच्या जगण्यात रोज कितीतरी अशा गोष्टी घडत असतात की, त्यांचा मनावर खूप परिणाम होतो.मग समोरची व्यक्ती अशी का बोलली किंवा अशी का वागली यामुळे मनावर विचारांची पुटे चढत जातात व समोरच्या व्यक्तीविषयी मन कलुषित होते.परंतु त्याला आहे तसे स्विकारले की तो किंवा ती तशीच आहे त्यामुळे तशीच वागणार हे समजल्याने मनावर ओरखडे उमटत नाहीत व समोरच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे आपण दुखावण्याचा प्रश्नच येत नाही.
याचा होणारा आणखी एक फायदा म्हणजे कुणाकडूनही कसलीच अपेक्षा करण्याची सवय लागत नाही.यामुळे आपण कुणावरही अवलंबून रहात नाही.इतर नात्यांमधून जे आणि जेवढे पदरात पडले त्यावर समाधान मानण्याची वृत्ती निर्माण होते.आपला आनंद आपण कुणाच्या वागण्याबोलण्यात शोधत नाही.त्यामुळे नातेसंबंधात आपल्या बाजूने कधीच कडवटपणा येत नाही.उलट समोरच्या व्यक्तीला आहे तसे स्विकारल्यामुळे नाती अधिक बळकट होतात.
ठेविले अनंते तैसेचि रहावे | चित्ती असो द्यावे समाधान || असा चुकीचा अर्थ मात्र काढू नका बरं का ! कारण वर मी समाधानी असावे असे लिहिले आहे. हे सगळे मनाच्या खेळाला उद्देशून लिहिलेले आहे. समर्थ रामदास स्वामींनी उगाच दोनशे पाच मनाचे श्लोक लिहिले नाहीत!
तर..समोरची व्यक्ती तंतोतंत आपल्यासारखाच विचार करेल किंवा तिने तसा करावा अशी अपेक्षा का करावी? आपल्याला जे योग्य वाटते ते समोरच्या व्यक्तीला तसेच भावेल असे नाही ना! किंवा त्या प्रसंगाकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन वेगळा असूच शकतो! व्यक्ती तितक्या प्रकृती हे आपल्याला माहीत आहे.आपण कुणाचाही स्वभाव बदलू शकत नाही हे चिरंतन सत्य आहे.जर त्या व्यक्तीने स्वतःहून प्रयत्न केला तरच तिच्यात बदल घडून येणार आहेत.
एक गोष्ट खरी आहे की, आपल्या चुकीच्या वागण्याचा कधीतरी स्वतःला पश्चात्ताप होतोच ! आणि नियतीने प्रत्येकाला कर्म करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे,पण त्यासोबतच कर्माचे फळ भोगण्याचे बंधनही घातले आहेच !
त्यामुळे आपण आपले सहजपणे स्विकारायला शिकले की आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी सोप्या वाटायला लागतात.खूपदा माणसे देवाला, दैवाला दोष देताना दिसतात.देवाला दोष देऊन परिस्थितीत बदल होणार आहे का? नाही ना? म्हणूनच स्विकारायला शिका आणि आयुष्य आनंदी सुखी बनवा, कारण सुख आपल्या मानण्यातच असते.इति हेमा उवाच...
©️सौ. हेमा पाटील.दिनांक १७/५/२०२४
Comments
Post a Comment